October 26, 2016



*दिवाळीत अंगाला उटणे लावण्याची पद्धत*

__________________________

दिवाळीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटणे अंगाला लावण्याची पद्धत कशी असावी, याचे विश्लेषण येथे देत आहोत. उटणे हे रजोगुणी तेजोमय असल्याने ते अंगाला लावतांना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बोटांच्या अग्रभागाचा अंगाला स्पर्श करून थोडेसे दाबून लावावे. प्रत्येक ठिकाणी दिलेली उटणे लावण्याची पद्धत त्या त्या पोकळीत असणार्‍यात्रासदायक वायूंच्या गतीला अनुसरून दिली आहे.


. *स्वतःला उटणे लावणे*

*१. कपाळ : कपाळावर लावतांना मधल्या तीन बोटांचा उपयोग करून स्वतः लावतांना डावीकडून उजवीकडे या पद्धतीने लावावे.
*२. कपाळाच्या दोन्ही टोकांना बाजूला भुवईजवळ : येथे लावतांना ते बोटांच्या अग्रभागांनी डावीकडून उजवीकडे (खालून वरच्या दिशेने), तसेच उजवीकडून डावीकडे (वरून खालच्या दिशेने) चोळून लावावे.
*३. डोळ्यांच्या पापण्या : यांवर लावतांना नाकाकडून कानाकडे हात फिरवावा.
*४. नाक :याला लावतांना उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनी यांनी नाकाच्या दोन्ही बाजूंनी खालच्या दिशेने उतरत यावे अन् खाली आल्यावर उटण्याचा वास घ्यावा. उटण्याच्या वासातून प्रक्षेपित होणारा तेजाशी संबंधित गंध फुफ्फुसांतील वायूकोषात गेल्याने तेथील काळे आवरण नष्ट होण्यास साहाय्य होते.
*५. मुखाचा वरचा भाग : या भागातून, म्हणजेच नाकाच्या खालून मधली तीन बोटे ठेवून आरंभ करून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मुखाभोवती गोल, म्हणजेच हनुवटीच्या खड्ड्यातून वर स्वतःच्या डावीकडे जाऊन मुखाभोवतीचा गोल पूर्ण करावा.

*६. गालांच्या पोकळी : गालाच्या मध्यभागातून आरंभ करून घड्याळाच्या काट्याप्रमाणे बोटांची अग्रे गोल गोल फिरवून लावावे.
*७. कानाची पाळी : ही तर्जनी आणि अंगठा यांमध्ये धरून तिथल्या तिथे हलवून उटणे लावावे.
*८. दोन्ही कान : दोन्ही कान हातांनी पकडून कानाच्या मागच्या बाजूला फक्त अंगठा ठेवून खालून वरच्या दिशेने फिरवावा.
*९. मान : मानेच्या मागून मध्यातून दोन्ही हातांची बोटे पुढे विशुद्ध चक्राकडे आणणे
*१०. छाती आणि पोट यांचा मध्यभाग : उजव्या हाताच्या तळव्याने छातीच्या मध्यरेषेवर वरून खालच्या दिशेने नाभीकडे हात फिरवत आणणे.
*११. काखेपासून कमरेपर्यंत : काखेपासून पितृतीर्थासारखा हात, म्हणजेच अंगठा एका बाजूला अन् चार बोटे दुसर्याम बाजूला ठेवून अंगाच्या दोन्ही बाजूच्या रेषेवरून वरून खाली या पद्धतीने फिरवावेत.
*१२. पाय आणि हात : हाताची बोटे फिरवत पायांवर आणि हातांवर वरून खालच्या दिशेने उटणे लावावे.
*१३. पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषा :पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषेवर अंगठा अन् तर्जनी यांनी विळखा घालून तो भाग कड्यासारखा घासावा.
*१४. डोक्याच्या मध्यभागी* : डोक्याच्या मध्यभागी तेल लावून ते हाताने घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवावे.

*दुसर्‍या व्यक्तीला उटणे लावणे*

*१. पाठ : दुसर्या व्यक्तीच्या पाठीला उटणे लावतांना पाठीच्या मणक्याच्या रेषेशी दोन्ही हातांच्या बोटांची अग्रे येतील अशा पद्धतीने वरून खालच्या दिशेने दोन्ही हात एकाच वेळी फिरवावेत.
*२. कंबर : दुसर्‍या व्यक्तीला लावतांना कमरेच्या आडव्या रेषेवर पाठीकडून तिच्या डाव्या बाजूकडून उजवीकडे येऊन परत उजवीकडून डावीकडे जावे. असे परत परत लावावे.
🌞
संकलन - श्रीधर कुलकर्णी
*ज्ञानामृत मंच*

*२६ आक्टोबर*
*वसुबारस*
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ...
*शुभ दिपावली*


दिवाळी मुहूर्त



*दिवाळीचा फराळ*

दिवाळीच्या फराळाची दिवाळीत भरली सभा
लाडू आपला शिष्टासारखा मधोमध उभा.


चकली, करंजी , शेव सगळ्या बायका होत्या तोऱ्यात
लाडू, चिवडा, चिरोटा, अनरसा या पुरुषांना अपुरी पडली परात.

क्वचितच हजेरी लावणारे एकटे पडले कडबोळे

पण त्याच्या सोबतीला धावून गेले शंकरपाळे.

कुरकुरीत चकली दिसत होती उठून
तिच्या अंगावरचे तीळ दाखवत होती मिरवून.

झणझणीत चिवडा नाकी-डोळी लावत होता धार
पण दाणे, खोबरं, डाळ असा त्याचा पसाराच फार.

गोरी गुलाबी करंजी झाली होती देखणी
तिला पाहताच तिची सगळे करत होते वाखाणणी.

गुबगुबीत चिरोटा मूळातच फार नाजूक
त्याच्या जवळ येताच वास येत होता साजुक.

लाडू चिवडा दोघे मित्र बसले होते लगटून
छोटासा बेदाणा लाडू ला बसला होता चिकटून.

कडबोळे आणि शेव रंगाने मस्त
पण त्यांच्यामुळे फराळ होतो लगेच फस्त,

अधिक मासाचा लाडका अनारसाही होता हजर
जरा कमी आधिक झालं की त्याला लागते नजर.

असा हा फराळ दिवाळीची वाढवतो लज्जत
पण नीट नाही जमला तर बायकांची होते फज्जत

त्याचं माझं भांडण
हळुवार छेडणारे त्याचे हात
अन चोरुन दाद देणारे माझे नयन

त्याचं माझं भांडण
त्याने अलगद मिठीत ओढणं
अन माझा सोडवण्याचा लटका प्रयत्न


त्याचं माझं भांडण
त्याने हळुच खोडीन पदर ओढणं
अन माझं नाटकी मागं वळणं

त्याचं माझं भांडण
त्यान हळुच कुशीत शिरणं
माझं डोक्याभोवती हात फिरवणं

त्याचं माझं भांडण
त्यानं घट्ट वेलीसारखं बिलगणं
अन मी पापण्या झुकवणं

त्याचं माझं भांडण
त्यानं प्रेमान रागवणं
माझं त्यावर गाल फुगवणं

त्याचं माझं भांडण
त्यानं कान पकडुन साॅरी म्हणनं
अन माझं लाजून पाणीपाणी होणं

त्याचं माझं भांडण
एकमेकांच्या मिठीत विरघळणं
श्वासातश्वास घालुन एकमेकांसाठीच जगणं
त्याचं माझं भांडण,.........

- - अपर्णा पाटील



"माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी". - पु. ल. देशपांडे
.
.
"कापडदुकानातले नोकरलोक हे गेल्या जन्मीचे (आणि या जन्मातले ही) योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे. बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. कसलाही आग्रह नाही.


लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत. बायका काय वाटेल ते बोलतात. "शी ! कसले हो हे भडक रंग !" लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्यासारखा चेहरा करून असतो. निष्काम, निरहंकारी चेहरा !

समोरची बाई म्हणत असते,

"कसला हा भरजरी पोत !"

हा शांत.

गिऱ्हाईक नऊवारी काकू असोत, नाहीतर पाचवारी शकू असो, ह्याच्या चेहऱ्यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते.

समोर शेपन्नास साड्यांचा ढीग पडलेला असतो, पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा, तसा अठरा रुपये, तेवीस बारा, बेचाळीस अश्या किमती हा गृहस्थ, "अथोक्षजाय नम: । अच्युताय नम: । उपेंद्राय नम: । नरसिंहाय नम: ।" ह्या चालीवर सांगत असतो.

सगळा ढीग पाहून झाला तरी प्रश्न येतोच,
"ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं?"

एक वेळ तेराला तीनानं पूर्ण भाग जाईल; पण लुगड्याची खरेदी आटोपली तरी एखाद्या प्रश्नाची बाकी उरतेच.

आपली स्वतःची बायको असूनसुद्धा आपल्याला तिच्या चेंगटपणाची चीड येते. पण कापडदुकानातले ते योगीराज शांतपणं म्हणतात, "नारायण, इचलकरंजी लेमन घे"

खरेच, माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी.

--------- पु. ल. देशपांड

June 30, 2016



मुसळधार कोसळणारा पाऊस
सोबत दर्द रफीजींच्या आवाजातला
आणि कमी आहे फक्त तुझी

रिमझिम बरसणाऱ्या निवांत धारा
खमंग भजी चहा बशीतला
आणि कमी आहे फक्त तुझी


कडाडणाऱ्या विजा सोसाट्याचा वारा
समोर तरळणारा प्रसंग आठवणीतला
आणि कमी आहे फक्त तुझी

छतावरून गळणारे टप टप थेंब
ओघळणारा कण कण माझ्या डोळ्यातला
आणि कमी आहे फक्त तुझी

प्रज्ञा रायकर जोशी

June 22, 2016

सांजेच्या काठावरती
अलवार क्षणांच्या भेटी
ही प्रीत आपली आहे
की शतजन्मांच्या गाठी...
कोणती तपस्या केली
ज्याने तू माझी झाली
आयुष्य घेतले माझे
थरथरत्या पदराखाली...
एकांत भावतो मजला
जो तुझी आठवण देतो
हा तुझ्या दिशेचा वारा
येतो अंगास बिलगतो...
एवढा दुरावा असुनी
भेटतो मनाने आपण
मग कायेवरती चढते
नाजुक स्पर्शांचे लेपण..
बोटाने नाव गिरवतो
वाळुत मुलायम ओल्या 
तू दिसते नावामध्ये
मन कातर झाल्या झाल्या...
ओंजळीस आयुष्याच्या
तू ओंजळ लाव तुझीही
पेटता दिवा प्रेमाचा
नाही विझणार कधीही...
-- संतोष

June 13, 2016

सुंदर काय असते 

रिमझिमत्या सरी आठवणी होऊन
वाहायला लागतात..
जरा कुठे त्याची चाहूल काय लागते,
लगेच कविताच सुचायला लागतात..!!!
- स्पृहा

डोळे भरून आले की..
तुझं रूप कसं दिसायला लागतं
छे! ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी
हलक्या हातानी कोणी पुसायला लागतं

- चंद्रशेखर गोखले

June 10, 2016

तुला म्हणून सांगते .....

पुन्हा पुन्हा शहारते, तुला म्हणून सांगते,
मिठीत वेड वाढते, तुला म्हणून सांगते .....

जिथे जिथे खुणा तुझ्या, वसंत पेरतो सख्या,
तिथेच मी विसावते, तुला म्हणून सांगते......

तुझी प्रिया तुझ्यासवे, नभात झेप घ्यावया,
गगनझुलाच मागते, तुला म्हणून सांगते ....

नजर कधी न लागण्या, तुला कुण्या सुरंगिची,
इथून दृष्ट काढते, तुला म्हणून सांगते.....

तुझे अबोल राहणे, दिशात शून्य पाहणे,
क्षणात मौन वाचते, तुला म्हणून सांगते....

धुक्यास पांघरून मी, तनामनास जाळते,
दवात रात जागते, तुला म्हणून सांगते......

तुझ्याच आरशातला, चुकार चेहरा पुन्हा,
नव्या ऋतूत पाहते, तुला म्हणून सांगते ......

माधुरी

June 9, 2016

माझ्यासारखच
तिचंही होतं
गप्पा रंगात आलेल्या असताना
समोर घर येतं
- ‪‎चंद्रशेखर गोखले‬

June 8, 2016

प्रेम कधीच अधुरे राहत नाही,
अधुरा राहतो तो विश्वास,
अधुरा राहतो तो श्वास,
अधुरी राहते ती कहाणी,
राजा पासून दुरावलेली
एक राणी...

June 7, 2016

तु सोडुन गेलेल्या वाटांवरती, आता मी देखिल फिरकत नाही
तुला सोबत न घेउन आलेलं, बहुदा त्यांनाही ते आवडत नाही
अशी आल्यापावली माझी कितीदा परत पाठवणी केलीय त्यांनी.................तुझ्यासाठी

तु दिसत नसलेल्या सांजेपासून, बेलगाम उधळलाय तो
प्रत्येक ओहोटीशी झुंज देत, तुझ्या शोधात निघालाय तो
हर भरतीला वेड्यापरी सगळे किनारे पिंजुन काढलेत त्याने....................तुझ्यासाठी

आजकाल तु या गावात नसतेस, हे बहुदा कळलयं आहे त्याला
खुणेच्या सगळ्या जागांवर अडला, तरी भेटली नाहीस त्याला
आजही तुझ्या आठवसरीं डोळ्यांत साठवुन पुन्हा पुन्हा दाटुन येतो तो............तुझ्यासाठी

तुला काही फरक पडला नसला, तरी तो खरचं उध्वस्त झालाय
खिडकीत तुझी वाट पाहुन, कित्येकदा ओसरीवरुनच परत गेलाय
जाताना मात्र सवयीने अंगणात पारिजातकाचा सडा सांडत जातो तो...........तुझ्यासाठी

हे सगळे माझ्याकडे "तुला" मागतात्, पण मी दाद देत नाही
तुला गमावल्याचा दोष मला लावतात्, तरी मी काहीच बोलत नाही
तुझ्या प्रतारणेच्या जखमा उरात दडवून आता कायमचा शांत झालोय मी..........तुझ्यासाठी

एक एकटा एकटाच

March 15, 2016

कोरी पाटी...
लहान मुलांचं मन ,
म्हणजे कोरी पाटी,
आईच्या हातात खडू,
त्यावर लिहिण्यासाठी
आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.
आई म्हणायची संध्याकाळची, झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात,
होत नाहीत पुढे.
आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.
आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही वाटत नाही,
खरं बोलायचं भय.
आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.
आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.
आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.
आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग,
लावायची कोणाला लागली लाथ तर,
पाया पडायला भाग.
दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.
आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.
आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवते सगळं,
जरी आता सगळं माझ्या हातात!
आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड व्हायच्या पापण्या अन
मिटायचे डोळे आपोआप.
अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.
जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ वाटून खायचे सात.
आई घालायची वाट पाहतांना
कोपऱ्यात पालथा पेला,
एव्हढा भाबडा विश्वास हिने
कुठून पैदा केला?
आई म्हणायची,......,आई म्हणायची,
आता खडू माझ्या हाती,
होता येईल का मला
असं माझ्या चिमण्यासाठी??

February 27, 2016

आताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते
बरा बोलता बोलता स्तब्द्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते
कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळूवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा
असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
नभातुन ज्या रोज जातो मुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा
न अंदाज कुठले न अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे न अनुमान काही
कशी हि अवस्था कुणाला कळावी
कुणाला पुसावी कुणी उत्तरावे
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे
गीतकार : संदीप खरे, गायक : संदीप खरे - सलील कुळकर्णी
https://www.youtube.com/watch?v=9MIkW0vnV2I

Touching...

Be Practical

कोणी म्हणतं seven days and six nights चं package म्हणजे प्रेम...???
मी म्हणतो चांदणी रात्र,
एक झोपाळा, आणि
हातात तिचा हात म्हणजे प्रेम !
कोणी म्हणतं पॅरीसच्या
संध्याकाळची रोषणाई म्हणजे प्रेम....
मी म्हणतो तिला अचानक
भेट दिली की,
तिच्या डोळ्यातली ती
चमक म्हणजे प्रेम!
कोणी म्हणतं काश्मीरच्या बागेत एकत्र फिरणं म्हणजे प्रेम....??
मी म्हणतो न सांगता एखादा गजरा तिच्या डोक्यात माळणं म्हणजे प्रेम !
कोणी म्हणतं फॅन्सी आणि स्टाईलिश कपडे घालून नवऱ्याबरोबर फिरणं म्हणजे प्रेम.... ?
मी म्हणतो सणाच्या दिवशी नटलेल्या तिच्याकडे डोळे भरून पहाणं म्हणजे प्रेम!
कोणी म्हणतं तिला गुलाबाचा गुच्छ देणं म्हणजे प्रेम.... ???
मी म्हणतो सगळ्यां देखत
एक क्षण चोरून तिला
"छान दिसतेस"
असं म्हणणं आणि
ते ऐकून तिचा चेहरा
गुलाबी होणं म्हणजे प्रेम !
कोणी म्हणतं तिच्या सुंदरतेवर कविता करणं म्हणजे प्रेम....???
मी म्हणतो ती माहेरी असताना
प्रत्येक कवितेत तिला पाहणं
म्हणजे प्रेम !
कोणी म्हणतं लाजेचा पडदा काढून एकामेकांना जाणून घेणं म्हणजे प्रेम....???
मी म्हणतो लग्नाच्या
१५ वर्षानंतर सुद्धा
उखाणा घेताना लाजणं
म्हणजे प्रेम !

;;