February 14, 2011
तू माझ्या आयुष्यात आलास , तेव्हापासून माझ्या जीवनाला एक वेगळं वळण लागलं. कळलंच नाही , की मी केव्हा प्रेमात पडले. मी प्रथम तुला होकार दिला , तेव्हाही मला वाटत नव्हतं , की मी प्रेमात पडले आहे. या 14 फेब्रुवारीला आपल्या प्रेमाला तीन वर्षं पूर्ण झाली. पण अजूनही आपण नवीन असल्यासारखं वाटतं. या तीन वर्षांत बरंच काही घडून गेलं. थोडं रुसणं , थोडंसं हसणं... तरी आपल्यातील नावीन्य काही कमी झालं नाही. आपण एकमेकांमध्ये एवढं सामावून घेतलं आहे , की फक्त चेहऱ्याच्या हालचालीवरून आपल्याला काय बोलायचं आहे , हे कळतं. तू माझ्यासाठी काहीच केलं नाहीस , असं तुला का वाटतं ? तू माझ्यासाठी भरपूर काही केलं आहेस. आज मी जे काही आहे , त्याचं पूर्ण श्रेय तुलाच आहे. आज आपण अशा वळणावर उभे आहोत , की पुढे काय होईल , याची कल्पना नाही. आपला विश्वास , आपलं प्रेम हीच सर्वात मोठी शक्ती आहे. आपल्यातील नि:स्वाथीर् , निरपेक्ष प्रेमामुळेच आपण एकत्र आहोत. तू म्हणतोस ना , की आपलं प्रेम फार वेगळं आहे... ते खरंच वेगळं आहे. आपण एकमेकांवरचे हक्क एकमेकांना पूर्णपणे दिले आहेत. पण कोणत्याही अटी आणि वचनामध्ये आपण एकमेकांना बांधलं नाही. प्रेमाला कधीही मोजमाप नसतं. फक्त भरपूर प्रेम करत राहायचं असतं. कधीकधी वाटतं , की तू एवढं करतोस , तर मीच कमी नाही पडणार ना ? कुठे कमी पडले किंवा काही चुकलं , तर मला नक्की सांग. खरंच मला माझं प्रेम व्यक्त करता येत नाही. तुझ्यासारखं छान छान लिहिता-बोलता येत नाही. तू म्हणतोस ना , काहीतरी लिहित जा. ज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही , त्या लिहून व्यक्त करता येतात. म्हणून हे फक्त तुझ्यासाठी. आत्तापर्यंत तू मला खूप काही दिलंस , मला समजून घेतलंस , खूप खूप प्रेम केलंस. आता फक्त एकच मागणं आहे , ' हृदयाचा ठोका चुकला तरी , तू मात्र चुकू नकोस , प्रेमाचं नातं परी , साथ कधी सोडू नकोस... '
- तुझीच
Labels: Prem Patra, Priyasi, Valentine's Day
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment