July 3, 2014

आलो आहे आता मी....

आलो आहे आता मी
मनसोक्त भिजून घे
पुन्हा लिही कविता माझ्यावर
हातात ती लेखणी घे


कोसळत्या सरींबरोबर
भाजक्या मक्याचा आस्वाद घे
छत्री दे भिरकावून
अन् हवं तेवढं बागडून घे

चिखलातून चालताना
पँट थोडी सावरून घे
घरी पोहोचायला उशीर होईल
रेल्वेचं कोलमडणं सांभाळून घे

गॅलरित बस निवांत
काॅफी आणि कांदाभजी घे
वाफांचं आणि सरींचं काँबिनेशन
समजत असेल तर समजून घे

असेल नसेल कोणी सोबत
तर त्यांनाही सामावून घे
भिजण्याची आवड नसेल
पण थोडं ईतरासाठी भिजून घे

छप्पर गळेल घराचं
ताडपत्रीवर तोंडसुख घे
माझ्या कोसळण्याचे बोल
मलाच लावण्याचंही सुख घे

पुन्हा मी निघून जाईन
हवं तेवढं ओंजळीत भरून घे
वर्षभर साठवून ठेवायचंय तूला
आज मात्र थोड्यावरंच भागवून घे

0 comments:

Post a Comment